Sunday, December 6, 2020

बीज अंकुरे अंकुरे ...







मध्यंतरी एक पुस्तक वाचले ' द सिक्रेट '.. खरंच वाचण्यारखे आणि अनेक वाचकांचे लाडके पुस्तक !. त्यातले एक वाक्य मला खूप काही सांगून गेले .

हे विश्व खूप चांगले प्रतिसाद  देणारे आहे . म्हणजे  जेवढे बीज पेरले जातात ते दिसत नाहीत परंतु त्यांची वाढ सतत होत असते. हे विश्व सुपीक जमिनी सारखे बीजांना अंकुर देत असते . म्हणजे कळत -नकळत आपण अनेक बीज पेरतो . राग,लोभ ,ईर्ष्या, भीती तसेच आनंद ,त्याग,मैत्री, दूरदृष्टी ,मैत्री  प्रेम सुद्धा ! हे सगळे सुद्धा बीजच आहेत . प्रार्थना , दया हे सुद्धा बीजच ! आपल्या मनातला प्रत्येक वि चार, प्रत्येक भाव हा एक बीज आहे.

जे जे बीज पेरलेले असेल  ते अंकुरत होत असतात . हि प्रक्रिया सतत अविरत सुरु असते .... अगदी सतत ! तुमचे लक्ष असो वा नसो बीज अंकुरीत होण्याचे कार्य अविरत सुरुच असते  ! प्रकृती प्रतिसाद द्यायचे विसरत  नाही !

फळ येण्यासाठी  काही काळ जाऊ द्यावा लागतो . अगदी आज माझ्या मनात आले आणि उद्या झाले असे  फार कमी होते ! (परंतु होऊ शकते !!)

आज मला पाणीपुरी  खावीशी वाटली तर ते शक्य आहे ! परंतु ती पाणी पुरी विराट कोहली सोबत खायची म्हटले तर मग मात्र अगदी उद्या शक्य नाही !

आणि ते योग्य आहे ! हा वेळ लागणे  आवश्यक आहे . मी जर कळत -नकळत सतत अपघाताचा विचार  करत असेल , तर ते सुद्धा एक बीजच आहे ! त्याला लगेच अंकुर फुटू नये यातच माझे भले आहे . कुठले बीज वाया जाऊ द्यावे याचे सुद्धा गणित आहे . कधी अंकुर येतो पण तो टीकत नाही . एखादा अंकुर थोडासा  वाढतो आणि लगेच खुंटतो . त्याचे खुंटणे  कधी चांगले कधी वाईट सुद्धा असू  शकते ! एखादी कविता मनात येते .. तो देखील  एक अंकुरच ! पण  तो खुंटला तर नुकसान  झाले ! परंतु 'हे जग वाईट आहे अन्यायी आहे'-- असला अंकुर खुंटला तरच बरे !


प्रकृती थोडा  वेळ देते . खरंच हवे आहे का बघते ! त्याने काही वाईट होणार असेल  तर नाहीच देत ! परंतु जे खरोखर हवे आहे ते बीज मनात खोलवर रुजते मग मात्र- सारी  कायनात उसे  तुमसे मिलाने मे जुड जाती है !

जसे अब्जावधी शुक्राणू असले तरी एकच गर्भ धारणा करू शकतो , तसेच कुठले बीज टिकवायचे  हे सुद्धा  प्रकृती स्वतः ठरवते . आधीचे कर्म  हे सारे  काही ठरवत असतात . कित्येक वेळी  छोटासा अपघात होतो . वास्तविक  मोठा अपघात होण्याचे बीज नकळत पेरले गेलेले असतात एखाद्या मनात ..परंतु त्याचे कर्म  तेवढे चांगले असतात . परंतु पेरलेले बीज देखील अतिशय सशक्त असल्याने  प्रकृतीला अपघात तर घडवून आणावाचं लागतो . मग ती त्या गणितानुसार छोटासा  अपघात घडवून आणते. म्म्हणजे  दोन्ही साध्य करते ! बीज अंकुरले आणि त्याने फळ सुद्धा दिले .. परंतु त्या व्यक्तीला फार काही झाले नाही .

कित्येक वेळा मोठ्या अपघातात सहज  वाचलेले लोक दिसतात

प्रकृती तशी अतिशय दयावान आहे . परंतु गणित कशाशी खातात हे मात्र तिच्या कडूनच शिकावे , एवढे नियम,एवढी आकडेमोड - ती सुद्धा प्रत्येकाची अगदी काटेकोरपणे  ! आणि .... अगदी अलगद.... बेमालूमपणे !

भगवत गीता म्म्हणते  - 'गहनो कर्मस्य गती: '! म्हणजे  भले भले विद्वान लोक सुद्धा कर्माची  गती जाणू  शकत नाहीत !

म्हणून आनंदी राहणे महत्वाचे ! आनंदी मन हे भविष्या साठी  चांगलेच बीज पेरत राहणार  नकळत ! नेहमी आनंदी राहणे जरा कठीण  आहे . परंतुप्रयत्न  करता येईल !

आपल्या मनात  कुठले अंकुर  जोपासायचे  आणि कुठले खुडून टाकायचे आणि मुख्य म्हणजे  कुठले बीज पेरायचे एवढे आपल्या हाती आहेच ! त्याकडे लक्ष हवे ! कितीही  धावपळीची दिनचर्या असली तरी!


मुक्ता बेहेरे -गद्रे

No comments:

Post a Comment