Sunday, July 11, 2021

विसावा


तू दिलासा माझा
माझ्या मनाचा विसावा
जरा हालचाल माझ्या मनात
अन लगेच तुला सुगावा

जरा डोकावले डोळ्यात
अन सारे कळलेले तुला
मनाची दशा माझ्या
तुझ्या पासून लपेना

मी तप्त धरती
तू पावसाचा शिडकावा
सौम्य गीत तुझे अन
सुट्टी तक्रारीच्या सूरान्ना 

तू दिलासा माझा
माझ्या मनाचा विसावा

विसम्बुन तुझ्यावर
मी विसावते क्षणभर
स्पर्शाने तुझ्या
सुखावते मनोमन

मी शांत सांजवेळ
तू राग मारवा
ऋतुचा जिथे कठीण ऊष्मा
तिथे तू पहाटेचा गारवा 

तू दिलासा माझा
माझ्या मनाचा विसावा

माझे असणे तुझ्या शिवाय
स्वरांशी गायकाचा जणू दुरावा
मी गीत असावे तू गायलेले
त्यातून हलकेच येणारा गोडवा

माझे मन म्हणजे
केवळ तुझा मागोवा 
नाजुक स्वप्नाळू हळवा
तू माझ्या स्वप्नाचा परतावा

तू दिलासा माझा
माझ्या मनाचा विसावा
जरा हालचाल माझ्या मनात
अन लगेच तुला सुगावा


-मुक्ता